मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सूतोवाच करून बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असून, शिवसेनेचा समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठिंबा आहे,’ असे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी येथे सांगितले. या संदर्भातील विधेयक संसदेत मंजूर व्हावे यासाठी आम्ही व्हीप जारी करू, असेही शेवाळे यांनी जाहीर केले.
‘बाळासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. गांधी कुटुंबाला खूश करण्यासाठी त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेत्यांसोबत बैठक केली. खरे तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेऊन त्यांच्या विचारांचे समर्थन करण्याची गरज होती,’ असे शेवाळे म्हणाले. ‘राम मंदिराची उभारणी, कलम ३७० रद्द करणे आणि समान नागरी कायदा करणे ही बाळासाहेबांची स्वप्ने होती. त्यापैकी दोन स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा लवकरच येईल. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी या कायद्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांच्या एक राष्ट्र, एक कायदा या संकल्पनेशी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.