पुणे : घरगुती गॅस सिलेंडरमधून एका लोखंडी नोझलच्या सहाय्याने अवैध व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या मोठ्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्याचा रॅकेटचा पर्दापाश करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ६ च्या पथकाने ही कारवाई केली आहे. मदन माधव बामने (वय-२०, रा. महादेव मंदीराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे (वय ३२) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार शेखर काटे यांना लोणी काळभोर येथील महादेव मंदीराजवळ असलेल्या साईसृष्टी बिल्डींग पाठीमागील एका गोठ्यामध्ये एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून बेकायदा विक्री करीत आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्र. ६ व लोणी काळभोर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा मदन बामने हा अवैधरित्या गॅस भरताना आढळून आला.
या छाप्यात पोलिसांनी ३१ हजार ९०० रुपये किंमतीच्या एचपी कंपनीच्या ११ कमर्शिअल गॅस टाक्या, १७ हजार १५० रुपये किंमतीच्या इंडेन कंपनी ७ घरगुती गॅस टाक्या, १३ हजार रुपये किमतीच्या पुष्पा कंपनीच्या ९ घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, ५१ हजार ४५० रुपये किंमतीच्या २१ एचपी कंपनीच्या घरगुती गॅस वापराच्या टाक्या, १९ हजार ४५० रुपये किंमत असलेल्या एचपी कंपनीच्या २१ घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, १४ हजार ७०० रुपये किंमतीच्या रिलायन्स कंपनीच्या ६ घरगुती वापराच्या गॅस टाक्या, ३ हजार ५०० रुपये किंमतीच्या २ एचपी कंपनीच्या लहान गॅस टाक्या, ८६ हजार रुपये किंमतीच्या एकून ८६ लहान वेगवेगळ्या लोकल कंपनीच्या गॅस टाक्या, ५०० रुपये किंमतीचे एकूण ५ नग गॅस ट्रान्सफर करण्याचे लोखंडी नोझल, २०० रुपयांचे एक पितळी नोझल, २ हजार रुपये किंमतीचे रेग्युलेटर पाईप व साडेतीन हजारांचा एक इलेक्ट्रीक वजनकाटा असा सुमारे २ लाख २४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी मदन बामने याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, अनधिकृत भरलेले गॅस सिलेंडर हे लोणी काळभोर येथील त्याच्या जय मल्हार गॅस सर्व्हीस या दुकानात ठेवून ग्राहकांना विक्री करीत असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८३/२८४ जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनीट चे ६ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार रामहरी वणवे, कानिफनाथ कारखेले, प्रदीप क्षीरसागर, पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन मुंडे,अक्षय कटके, सचिन सोनवणे, प्रतीक्षा पानसरे, बालाजी बांगर व हवेलीचे पुरवठा निरीक्षक इम्रान मुलाणी यांच्या पथकाने केली आहे.