पुणे : ओमानच्या सागरी हद्दीत ‘एमव्ही जीएफएस गॅलक्सी’ या व्यापारी नौकेवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे. या वृत्तामुळे करमरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पुण्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे. हेरंब करमरकर हे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ जहाजावरील अभियंता म्हणून समुद्रात कार्यरत होते. त्यांचा प्रवास संपत आला होता आणि काही दिवसांतच ते सुट्टीसाठी पुण्यातील आपल्या कुटुंबाकडे परतणार होते. रविवारी पहाटे २.५० वाजण्याच्या सुमारास त्यांनी भारतातील आपल्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सर्वांची विचारपूस केली होती. कुटुंबीयांशी झालेला तो संवादच त्यांचा अखेरचा ठरला. त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांनी, पहाटे साडेतीनच्या सुमारास, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ नौकेवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन विभागात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. त्या वेळी जहाजावर एकूण २४ कर्मचारी कार्यरत होते, त्यापैकी ११ जण भारतीय होते. हल्ल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आणि ओमानच्या नौदलाने २३ कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, हेरंब करमरकर बेपत्ता असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती.
हेरंब करमरकर यांचा शोध सुरू असताना त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला ते सुरक्षित सापडावेत, अशी आशा होती. मात्र, मंगळवारी प्रशासनाकडून त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आणि सर्व आशांवर विरजण पडले. हेरंब यांचे निकटवर्तीय ऋषी टंडन यांनीही माध्यमांशी बोलताना या दुःखद वृत्ताला दुजोरा दिला. काही दिवसांत आपल्या मुलाला भेटण्याची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबीयांना आता त्यांचे पार्थिवच घरी येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे करमरकर कुटुंबासह त्यांच्या मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, पुण्याने एक कर्तव्यदक्ष आणि गुणी अभियंता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हल्ल्याच्या कारणांचा आणि घटनेच्या नेमक्या परिस्थितीचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, या प्रकरणाबाबत पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.






