मुंबई : घरातील आजारपण आणि इतर ईडापिडा धार्मिक विधी करून दूर करतो, असे सांगून एका भोंदूने शिवडीतील महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला सुमारे १७ लाखांची फसवणूक केली. तावीज, बळी तसेच वेगवेगळ्या धार्मिक विधीसाठी त्याने रोख रक्कम आणि सोने घेतले. काळ्या जादूने फसवणूक करणाऱ्या या भोंदूविरुद्ध रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरामध्ये काही काम केले तर लगेच अंगदुखी जडते, कंबरदुखीने तर आधीपासूनच पछाडले आहे, असे शिवडीत राहणाऱ्या सायराची तक्रार होती. अशातच सायराचा दूरचा नातेवाईक अबुबकार शेख हा बऱ्याच दिवसांनी तिच्या घरी आला. त्याने सायराच्या या तक्रारी ऐकल्या. औषधोपचार करून काहीच फरक पडत नसल्याने आपल्याकडील तांत्रिक विद्येचा वापर करून ही दुखणी घालवू शकतो, असे त्याने सांगितले. मात्र यासाठी काही रोख रक्कम आणि काही सोने द्यावे लागेल, असे तो म्हणाला. घरातील कायमची कटकट आणि दुखणी जाणार असल्याने सायरा खर्च करायला तयार झाली.
अबूबकार याने टप्प्याटप्प्याने थोडेथोडे करून पैसे आणि सोन्याचे दागिने घेण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे सायरा पैसे आणि सोने देत होती त्यानुसार तो काहीतरी धार्मिक विधी केल्याचे भासवायचा. कधी मंतरलेले तावीज द्यायचा, तर कधी बकऱ्याचा बळी द्यायचा सांगून पैसे घ्यायचा. सुमारे १७ तोळ्यांचे दागिने आणि सहा लाख रुपये रोख सायरा हिने अबूबकारला दिले. मात्र तब्येत काही सुधारत नव्हती. घरामध्ये वादविवाद सुरूच होते. अबूबकार मात्र काही ना काही सांगून टाळाटाळ करीत होता. हे पाहून आपली फसवणूक झाल्याचे सायरा हिच्या लक्षात आले आणि तिने पोलिस ठाण्यात तक्रार केली.