मुंबई : धर्मांतर साखरे प्रकार अजितबात खपवून घेऊ नका, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाच्या मुळाशी जावे तसेच अंमलीपदार्थ विरोधात राज्यभरात कठोर मोहिम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या नाशिक धर्मांतर आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभाग आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पोलीस महासंचालक सदानंद दाते, गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख नवल बजाज, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. बैठकीत फडणवीस यांनी नाशिक धर्मांतर, भोंदूबाबा अशोक खरात, परतवाडा, गोरेगाव अंमलीपदार्थ आदी प्रकरणांच्या तपासाचा घेतला आढावा आणि पोलिस विभागाला विविध सूचना दिल्या.
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात पीडितांना संपूर्ण विश्वास द्या.या प्रकरणात कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्यायालयात हे प्रकरण मजबूत कसे होईल, यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हा महत्वाचा घटक असला पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कठो भूमिका घेतली असून राज्यात कुठेही धर्मांतरासारखे प्रकार हे अजिबात खपवून घेऊ नका असे सक्त आदेश दिले. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणल्याबद्दल त्यांचे अभिनंतर करताना या प्रकरणाचा तपासही तितकाच दमदार झाला पाहिजे. यात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही ॲंगल तपासातून सुटू नये. तसेच या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या. राज्यात अन्य कुठेही असे प्रकार घडत असल्यास कठोर कारवाई करा असे आदेशही त्यांनी दिले. काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथे एका पार्टीत अंमलीपदार्थ सेवनाने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत संपूर्ण राज्यात अंमलीपदार्थ विरोधात धडक मोहिम राबवा. अंमलीपदार्थ विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा. तरुणाईच्या भविष्याशी निगडित ही बाब आहे, त्यामुळे अशी प्रकरणे एकदम गांभीर्याने घ्या असे आदेशही फडवणवीस यांनी दिले. या प्रकरणात पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास दिला पाहिजे. यासाठी संबधित समाजसेवकांची मदत घ्यावी.






