मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा प्रीमियर शो मुंबईतील आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आणि पंढरपूर वारीच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारशाचा प्रभावी वेध घेणाऱ्या या माहितीपटाला उपस्थित मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रीमियर शोला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, उपसंचालक वर्षा आंधळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माहितीपटाच्या सादरीकरणानंतर उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करत हा चित्रपट केवळ माहितीपट नसून प्रत्यक्ष पंढरपूर वारीचा अनुभव देणारा दृश्यप्रवास असल्याचे सांगितले. चित्रपटगृहात बसूनही आपण वारकऱ्यांसोबत वारी करत आहोत, विठ्ठल नामाचा गजर अनुभवत आहोत आणि संतांच्या पाऊलखुणांवरून चालत आहोत, अशी अनुभूती या माहितीपटामुळे मिळाल्याचे अनेकांनी नमूद केले. वारीची भक्ती, परंपरा, समर्पण आणि समाजप्रबोधनाचा संदेश प्रभावी चित्रणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचेही यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.
‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा २२ मिनिटांचा माहितीपट वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा माहितीपट मराठीसह इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भारतीय भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील विविध भाषिक प्रेक्षकांना पंढरपूर वारीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतांच्या कार्याचा परिचय होणार आहे. या माहितीपटाचे प्रसारण डिस्कव्हरी समूहाच्या नऊ उपग्रह वाहिन्यांवर करण्यात येत असून त्यामध्ये डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अॅनिमल प्लॅनेट, अॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (आयडी), डिस्कव्हरी सायन्स आणि डिस्कव्हरी टर्बो या वाहिन्यांचा समावेश आहे. विविध भाषांमधून आणि विविध वाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या या माहितीपटामुळे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, पंढरपूर वारीच्या अनोख्या सांस्कृतिक वारशाचा आणि भक्तीपरंपरेचा संदेश देश-विदेशातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






