मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतूने निवडणूक आयोगाने काही गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी ६३ बड्या हौसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याचे अंतिम केले आहे. निवडणूक आयोगाने त्यास परवानगी दिल्यानंतरच तेथेच मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या सोसायट्यांतील रहिवाशांना घराखालीच मतदान करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होता यावे, याकरिता निवडणूक आयोग विविध योजना आखत आहे.
हौसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र अंतिम करताना सुरक्षितता, त्या सोसायटीतील मतदारांची संख्या आणि मतदान केंद्र तसेच मतदारांना व्यवस्थित जागा उपलब्ध होईल हे सर्व निकष बघूनच मतदान केंद्रे अंतिम केली जात आहेत. कुठेही मतदान केंद्र स्थापन करण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. त्या ठिकाणच्या रहिवाशांशी संवाद साधूनच केंद्र अंतिम केली जात आहेत. मतदान करणे मतदारांना सोयीचे व्हावे, यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. शहरातील ६३ हौसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या अशा पद्धतीने हौसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र तयार करण्याची पहिलीच वेळ आहे. मतदान केंद्र उभारताना सुरक्षितता, मुबलक जागा, मतदारांची सोय असे विविध निकष पाहिले गेले आहेत. जास्त नागरिकांनी मतदान करावे म्हणून अशा पद्धतीची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. समाजातील मान्यवर व्यक्तींमार्फत मतदान करण्यासही आवाहन करणे, दिव्यांगांसाठी विविध विशेष सुविधा पुरवणे, नवमतदारांमध्ये जनजागृती उपक्रम राबवणे आदी उपक्रम हाती घेतले आहेत. यंदा प्रथमच ८५ पेक्षा अधिक वयाच्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित मतदारांच्या घरी जाऊन त्यांची विचारणा केली जात आहे.