पुणे : पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाने बनावट कागदपत्रासह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे पाचही जण भारत देशात बेकायदेशीर रित्या राहत होते. ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार, वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा, आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांचे नाव आहे.
हे संशयित आरोपी भारतात बनावट आधार कार्ड, जन्माचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट बनवून राहत होते. दहशत विरोधी पथकाला याची माहिती मिळताच छापा टाकून पाचही नागरिकांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संशयितांकडून सिम कार्ड, ११ हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सिम आदी साहित्य जप्त केले. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम व भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.