मुंबई : रखडलेल्या रस्ते कामांना गती देण्यासाठी ज्या कंत्राटदारांकडील कामे रखडली आहेत, ती दुसऱ्या कंत्राटदाराला देऊन पूर्ण करून घेतले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे. तसेच संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील खड्ड्यांची समस्या कायमची सोडवण्यासाठी सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जानेवारी २०२३ मध्ये ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी सहा हजार कोटींच्या कामांचे कार्यादेश कंत्राटदारांना दिले आहेत. विविध कारणांमुळे ही कामे रखडली आहेत. आतापर्यंत सुमारे २५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे महापालिकेवर टीकेची झोड उठत आहे. दरम्यानच्या काळात दुसऱ्या टप्प्यात आणखी ४०० किमीच्या २०० हून अधिक रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी महापालिकेने सहा हजार कोटींच्या निविदा मागवल्या असून पाच कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत. ही कामे पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहेत.
महापालिकेने ३० मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असून अधिकाधिक रस्ते कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील किमान ५० टक्के कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. मात्र कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे पालिकेला हे लक्ष्य गाठण्यात अपयश आले आहे. कंत्राटदारांना कामाचा पूर्णत्वाचा कालावधी तसेच विशिष्ट महिन्यांची विधिग्राह्यता दिली जाते. ती पाळण्यात अपयशी ठरलेल्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत २५ मे नंतर सर्व प्रकारची कामे थांबवली जातात. काँक्रीटीकरणामध्ये रस्त्यांचा सध्याचा पृष्ठभाग खोदून काँक्रीटच्या थरांनी भरला जातो. त्यावर काँक्रीटचे विविध थर टाकून पाण्याचा मारा व सुकविण्याच्या प्रक्रियेला किमान ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे नवीन रस्ते खोदण्यास परवानगी दिली जात नाही, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या काँक्रीटचे थर टाकण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी तसेच रस्ते चांगल्या स्थितीत राहावेत व खोदलेले सर्व भाग भरले जावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत सिमेंट-काँक्रीटची कामे गेल्या एक वर्षांहून अधिक काळ रखडली आहेत. या कामांची गती पाहता या वर्षीदेखील मुंबईकरांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे असे दिसत असल्याची टीका महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना महापालिकेला जाग आली आहे. कामे रखडवणाऱ्यांवर पालिका आयुक्तांनी तत्काळ कारवाई सुरू करावी व मुंबईकरांना दिलासा द्यावा, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.
पालिकेच्या अखत्यारीतील रस्ते : २,०५५ किमी
आतापर्यंत झालेले काँक्रीटीकरण : १,२२४ किमी
शिल्लक काँक्रीटीकरण : ८२६ किमी