सातारा : फलटण तालुक्यात सध्या दुःखाचे वातावरण आहे. अलीकडेच झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कर्तव्यावर असलेले अंगरक्षक विदीप जाधव यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्याला धक्का बसला असून जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्यनिष्ठ पोलीस म्हणून ओळख असलेल्या विदीप जाधव यांच्या जाण्याने केवळ एक अधिकारीच नाही तर एका कुटुंबाचा आधार हरपला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सांत्वण भेट देतील अशी बातमी समोर आली होती. या मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांचा हा पहिला आणि महत्त्वाचा निर्णय ठरत आहे.
अपघातानंतर जाधव कुटुंबीयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. विदीप जाधव यांच्या पश्चात पत्नी, २ लहान मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे. सर्वांच्या जबाबदाऱ्या एकट्या पत्नीवर आल्या असून भविष्याबाबत चिंता वाढली आहे. विदीप जाधव यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस सेवेत प्रवेश केला होता. प्रामाणिक कर्तव्य बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले आहे. घरखर्च, मुलांचे संगोपन आणि शिक्षण यांचा मोठा भार आता कुटुंबावर पडला आहे. या कठीण काळात आमदार रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची ग्वाही दिली आहे. मात्र कुटुंबाची प्रमुख मागणी अशी होती की विदीप जाधव यांच्या पत्नीला योग्य नोकरी मिळावी, जेणेकरून कुटुंबाला कायमस्वरूपी आधार मिळू शकेल. आत्त ही मागणी सुनेत्रा पवार यांनी मान्य केली आहे. अपघाताच्या दिवशी नेमके विमानात कोण होते, याची माहिती कुटुंबीयांना नव्हती. त्या दिवशी कोणताही फोनवर संवादही झाला नव्हता. त्यामुळे अपघाताची बातमी समजताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. आता शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा व्यक्त होत असताना जाधव कुटुंबीयांना न्याय आणि सुरक्षित भविष्य मिळावे, अशी मागणी मान्य झालेली आहे.







