मुंबई : ओमिक्रॉनचा नवा उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’चा रुग्ण सिंधुदुर्गात सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या नव्या उपप्रकाराचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असला तरी मागील महिनाभरापासून राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यामध्ये मागील चार आठवड्यांमध्ये म्हणजेच २४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत तब्बल १०२ रुग्ण सापडले आहेत. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील रुग्णसंख्येत चार पटीने वाढ झाली आहे.
राज्यामध्ये २४ ते ३० नोव्हेंबरदरम्यान करोनाचे १३ रुग्ण होते. त्यामध्ये सातत्याने वाढ होत असून, १५ ते २१ डिसेंबरदरम्यान राज्यात ५३ रुग्ण सापडले आहेत. चार आठवड्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत चार पटीने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २४ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या चार आठवड्यांमध्ये राज्यामध्ये करोनाचे १०२ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ५३ रुग्ण सध्या सक्रिय आहेत. यापैकी मुंबईमध्ये सर्वाधिक २७, ठाणे १०, पुणे १०, रायगड ३, कोल्हापूर २ आणि नागपूरमध्ये एक सक्रिय रुग्ण आहे. मुंबईमध्ये २१ डिसेंबरपर्यंत केलेल्या १००५ चाचण्यांमध्ये ३४ रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील २७ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, उर्वरित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सापडलेल्या करोना रुग्णांपैकी ९१.१ टक्के रुग्ण गृह विलीगीकरणात आहेत. तर ८.९ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ४.४ टक्के, तर सर्वसाधारण विभागातील रुग्णांची संख्या ४.५ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. मात्र १ जानेवारी २०२२ पासून आजपर्यंत तब्बल १३४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये सहव्याधी असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मृत्युंपैकी ७०.९० टक्के रुग्ण ६० वर्षांवरील, तर ८४ टक्के सहबाधित, १६ टक्के कोणताही आजार नसलेले रुग्ण होते. सध्या राज्यातील मृत्युदर १.८१ टक्के आहे.
चार आठवड्यातील रुग्णसंख्या
२४ ते ३० नोव्हेंबर – १३
१ ते ७ डिसेंबर – १७
८ ते १४ डिसेंबर – १९
१५ ते २१ डिसेंबर – ५३