पुणे : लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी बुधवारी भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या आर्मी कमांडरपदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर डिसेंबर १९८८ मध्ये ‘७४ आर्मर्ड रेजिमेंट’मध्ये नियुक्त झाले होते. चार दशकांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विविध भौगोलिक, सामरिक आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांनी आर्मर्ड रेजिमेंट, स्वतंत्र आर्मर्ड ब्रिगेड, पायदळ तुकडी आणि स्ट्राईक कॉर्प्सचे नेतृत्व केले असून लष्करातील विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे. यामध्ये स्ट्राईक कॉर्प्समध्ये कर्नल मिलिटरी सेक्रेटरी, पश्चिम क्षेत्रातील आर्मर्ड डिव्हिजनचे कर्नल जनरल स्टाफ, स्ट्राईक कॉर्प्सचे ब्रिगेडियर क्वार्टरमास्टर जनरल, ऑपरेशनल कमांडचे ब्रिगेडियर जनरल स्टाफ, आर्मर्ड कॉर्प्सचे अतिरिक्त महासंचालक, प्रादेशिक सेनेचे महासंचालक तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. याशिवाय भूतानमधील भारतीय लष्करी प्रशिक्षण पथकात तसेच मॉस्को येथील भारतीय दूतावासात संरक्षण आणि लष्करी सहचारी म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्याकडे आर्मेनिया आणि बेलारूसची अतिरिक्त जबाबदारीही होती.
लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज यांचे पदव्युत्तर पदवीधर आहेत. संरक्षण आणि सामरिक अध्ययन, व्यवस्थापन अध्ययन तसेच संरक्षण व आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांमध्ये त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. उल्लेखनीय लष्करी योगदानाबद्दल त्यांना अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, लष्करप्रमुखांचे प्रशस्तीपत्र आणि तीन आर्मी कमांडर प्रशस्तीपत्रांनी गौरविण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दक्षिण कमांड युद्धस्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर दक्षिण मुख्यालयात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये उच्चस्तरीय सज्जता कायम राखणे, तिन्ही संरक्षण दलांमधील समन्वय अधिक मजबूत करणे, स्वदेशी संरक्षण क्षमतांचा विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार यावर भर देणार असल्याचे सांगितले. भारतीय लष्कराच्या गौरवशाली परंपरा जपत प्रत्येक सैनिकाने राष्ट्रसेवेत सर्वोच्च व्यावसायिकता आणि उत्कृष्टतेचे निकष कायम राखावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी ‘२ कॉर्प्स’चे नेतृत्व करत महत्त्वपूर्ण धोरणात्मक भूमिका बजावली होती, ज्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची विशेष दखल घेण्यात आली आहे.







