वृत्तसंस्था : आसाममधील गुवाहाटी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी अक्षय बनसोडे याला तब्बल ५५ कोटी रुपये किमतीच्या सुमारे ३७ किलो २४ कॅरेट सोन्यासह अटक केली आहे. या प्रकरणाचा संबंध मध्य पूर्व आणि म्यानमारमार्गे कार्यरत असलेल्या संशयित आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या जाळ्याशी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सोमवारी सायंकाळी गुवाहाटीतील खरघुली परिसरात गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपआयुक्त संभवी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली तेव्हा त्याने भिकारी किंवा बेघर व्यक्तीसारखे कपडे परिधान केले होते. त्याच्या हातात असलेल्या घोंगडीमध्ये आणि कपड्यांमध्ये सोन्याचा साठा लपविण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण सोने जप्त करून ते तपासासाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात बनसोडे हा गेल्या दोन वर्षांपासून गुवाहाटीतील गांधी वस्ती परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोन्याची वाहतूक करणारा ‘कुरिअर’ म्हणून काम करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपासादरम्यान आरोपीने गेल्या दोन महिन्यांत सुमारे २० किलो तस्करीच्या सोन्याची वाहतूक केल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांच्या मते, या प्रकरणाचे धागेदोरे मध्य पूर्व, म्यानमार तसेच देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू या शहरांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ स्थानिक नसून मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या साखळीचा भाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचा खरा मालक कोण आहे, ते कुठून आणण्यात आले आणि त्याचा अंतिम उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी आरोपीच्या आर्थिक व्यवहारांची, बँक खात्यांची तसेच दूरध्वनीवरील संपर्क नोंदींची छाननी सुरू केली आहे. या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटविण्याचाही प्रयत्न सुरू असून, संबंधित संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. आरोपी अक्षय बनसोडेविरुद्ध लटासिल पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील चौकशीसाठी त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणातून आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.






