ओव्हल: लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचमध्ये अजिंक्य रहाणे (८९) आणि शार्दूल ठाकूर (५१) यांच्या शतकी भागिदारीने भारताला मोठा दिलासा मिळाला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १०९ धावांची भागिदारी केली. रहाणे-जडेजा जोडीमुळे टीम इंडियाला काही प्रमाणात कमबॅक करता आले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ बाद १२० धावा केल्या होत्या. त्यांनी पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या, आताच त्यांच्याकडे २९६ धावांची आघाडी असून मॅचवर मजबूत पकड मिळवली आहे. मॅचच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर बाद करण्याचे आव्हान असेल. दरम्यान भारताच्या पहिल्या डावात शार्दूल ठाकूरने अर्धशतकी खेळी करत एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला.
तिसऱ्या दिवशी केएस भरत बाद झाल्यानंतर शार्दूल ठाकूर मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टाकलेल्या २-३ चेंडू त्याच्या हाताला लागले. तरी शार्दूलने हार मानली नाही. अजिंक्यसह तो मैदानात लढला आणि शतकी भागिदारी केली. त्याने अर्धशतक झळकावले. द ओव्हल मैदानावर सलग तिसऱ्या डावात शार्दूलने ५० हून अधिक धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात द ओव्हल मैदानावर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन आणि एलन बॉर्डर यांनी अशी कामगिरी केली होती. शार्दूल ठाकूरने याआधी जेव्हा भारतीय संघ २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता तेव्हा कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हल मैदानावर खेळला होता. शार्दूलने या सामन्यातील दोन्ही डावात ५० हून अधिक धावा केल्या होत्या. पहिल्या डावात त्याने फक्त ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा ठोकल्या होत्या. त्या डावात भारताकडून झालेली ती सर्वोच्च खेळी होती. त्याने ३२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये कसोटीत कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून झालेली ही सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी आहे. तर दुसऱ्या डावात त्याने ७२ चेंडूत ६० धावा केल्या होत्या.