डोंबिवली : येथील एका तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून भामट्यांनी ३३ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. हेमांशु हर्षदकुमार शहा (४०, रा. विको नाका, एमआयडीसी, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. गेल्या महिन्यात भामट्यांनी तक्रारदार हेमांशु यांना संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन व्यवहारांची माहिती देऊन या व्यवहारात गुंतवणूक केल्यास झटपट दामदुप्पट पैसे मिळतील असे अमिष दाखविले. सुरुवातीला पैसे मिळत गेल्याने हेमांशु यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ३३ लाख २८ हजार रुपये ऑनलाईन व्यवहारातून गुंतवणूक केले.
या गुंतवणुकीतून आकर्षक परतावा मिळणे आवश्यक होते. तो मिळणे बंद झाले. आकर्षक व्याज आणि मूळ रक्कम परत मिळावी म्हणून हेमांशु शहा भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. सुरूवातीला त्यांनी किरकोळ कारणे देऊन हेमांशु यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला प्रतिसाद देणे बंद केले. आपणास भामट्यांनी फसविले याची खात्री पटल्यावर हेमांशु यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली परिसरात ऑनलाईन माध्यमातून फसवणुकीचे सुमारे १०० हून अधिक गुन्हे घडले आहेेत. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. गांगुर्डे तपास करत आहेत.