मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण आणि मुंबई-मडगाव आणि मुंबई-सावंतवाडी रोड या गाड्यांच्या एकूण २२ फेऱ्यांना प्रत्येकी दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या विशेष एक्स्प्रेसमधील प्रतीक्षायादीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११५१/०११५२ सीएसएमटी-मडगाव- सीएसएमटी आणि ०११७१/०११७२ सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी या दोन्ही गणपती विशेष गाड्यांच्या २२ फेऱ्या २० डब्यांच्या चालविण्याची घोषणा केली होती. या गाड्यांचे आरक्षणही हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र प्रवाशांची वाढती मागणी आणि शेकडोंपार गेलेली प्रतीक्षायादीमुळे प्रत्येक गाडीला शयनयान श्रेणीचे अतिरिक्त दोन डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांची डब्याची संख्या २० वरून २२ डब्यावर पोहचणार आहे. आता या दोन्ही गाड्यांचा सुधारित संरचनेनूसार उत्सव विशेष फेऱ्या एलएचबी रेल्वेगाड्याऐवजी आयसीएफ रेल्वेगाडीमध्ये धावणार आहे. २० शयनयान श्रेणीचे डबे आणि दोन डबे सीटींग कम लगेज या श्रेणीतील असणार आहे.
रेल्वेचे आवाहन – सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी आणि सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी या गाड्यांतील प्रतीक्षायादीतील प्रवाशांना वाढीव आसनांचा लाभ मिळणार आहे. यामुळे या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांनी आपले तिकीट तपासून पुढील नियोजनाला सुरूवात करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.