पुणे : कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळून आले आहे. या दहशतवाद्यांचा पुण्यात कोठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्याबरोबर असलेल्या पसार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३), दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांचा म्होरक्या महंमद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला आहे.. साकी आणि खान आयसीस या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबधित असून, ते जयपूर येथे बाँबस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. स्फोटके बाळगेल्याप्रकरणी एनआयएने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते. दीड वर्षांपासून ते कोंढव्यात वास्तव्यास होते. कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात दुचाकी चोरताना दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. दहशतवादी दुचाकीत स्फोटके ठेवून बाॅबस्फोट घडविणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी दहा जुलै २०१४ रोजी शहराच्या मध्यभागातील फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकीत स्फोटके ठेवून स्फोट घडविण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत एनआयए, एटीएस, तसेच पुणे पोलिसांकडून दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे. एनआयएच्या पथकाने कोथरुड भागास भेट दिली. खान आणि साकी कोंढव्यात ज्या भागात राहायला होते. त्या भागाचीही पाहणी एनआयएच्या पथकाने केली.
इम्रान खान आणि युनूस साकी कोंढवा भागात भाडेतत्वावर राहत होते. दोघे ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावरत होते. दोघांची माहिती घरमालकाला नव्हती. घरमालकाने त्यांच्याशी भाडेकरार केला नव्हता. कोंढवा पोलीस ठाण्यात भाडेकरुंची नोंद घरमालकाने केली नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शहरातील अनेक घरमालक भाडेकरुंची माहिती पोलिसांना देत नाही. भाडेकरुंची नोंद न केल्यास पोलिसांनी घरमालकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला होता. सुरुवातीला घरमालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई बारगळल्याने पोलिसांना आता भाडेकरु नोंदणी माेहीम राबवावी लागणार आहे.