मुंबई : अलिकडेच ठाकरे गटाच्या विधान परिषेदेवरील आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची साथ सोडली होती. त्यांच्या पाठोपाठ आज नीलम गोऱ्हे यांनीही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला हा सर्वात मोठा धक्का समजला जात आहे.
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदेंनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
नीलम गोऱ्हे यांची ओळख फक्त विधान परिषदेवरील आमदार नाही, तर त्या अनेक वर्ष विधान परिषद सभागृहात उपसभापती म्हणून काम करत आहेत नीलम गोऱ्हे यांनी १९९८ साली शिवसेना पक्षात प्रवेश घेतला, तेव्हापासून त्यांची निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्ष त्यांनी प्रसार माध्यमात शिवसेनेची खंबीरपणे बाजू मांडली आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून पक्षाची नव्याने बांधणी केली जात असतानाच आणखी एक महत्त्वाच्या महिला नेत्या शिवबंधन तोडून गेल्याने उद्धव ठाकरे गटाला हा मोठा हादरा मानला जात आहे.
शिशिर शिंदे यांनीही थेट उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांनीही काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
मनिषा कायंदे पाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं विधान परिषदेतील संख्याबळ घटलं आहे. सर्वात आधी विप्लव बाजोरिया यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर मनिषा कायंदे या दुसऱ्या आमदार होत्या. त्यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनीही शिंदेंच्या सेनेची वाट धरली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ तीन आमदारांनी कमी झाले आहे.