नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच नवी मुंबई महानगरपालिकेने आठ विभागात झळकत असलेले अनधिकृत बॅनर्स आणि होडींग्जवर कारवाई केली. यामध्ये १३ ते १६ ऑक्टोबर या ४ दिवसांच्या कालावधीत ४४१८ इतक्या मोठ्या संख्येने छोटे मोठे अनधिकृत बॅनर्स व होडींग हटविण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सदर मोहीम आठही विभाग कार्यालय स्तरावर युध्दपातळीवर राबविण्यात आली. संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून शासकीय, सार्वजनिक व खाजगी अशा तिन्ही मालमत्तांवर तसेच जागांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आल्या आहेत.
यामध्ये बेलापूर विभागात ३९१, नेरुळ विभागात ११३९, वाशी विभागात ४४४, तुर्भे विभागात १००५, कोपरखैरणे विभागात ५७१, घणसोली विभागात ३५०, ऐरोली विभागात ३३१, दिघा विभागात १८७ अशा प्रकारे एकूण ४४१८ छोटे-मोठे बॅनर्स व होडींग स्वरुपातील अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आल्या आहेत. याशिवाय सार्वजनिक भिंतींवरील चित्रे, लेखन, पोस्टर्स, पेपर्स, झेंडे, कमानी देखील हटविण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करताना विनापरवानगी अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. यापुढील काळात निवडणूक विभागाची रितसर परवानगी घेऊनच परवानगी दिलेल्या ठिकाणी मान्यता मिळालेल्या आकारात जाहिराती प्रसिध्द कराव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.








