नवी मुंबई : अमली पदार्थाच्या अवैध व्यवसायात अग्रभागी असलेल्या एक हजारांहून अधिक आफ्रिकन वंशाच्या नागरिकांना मायदेशी धाडण्याची कारवाई करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांनी नशामुक्तीचा नारा देत ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाची सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ होताच पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी यापुढे कुणीही व्यक्ती नशेला बळी पडू नये यासाठी विशेष मोहिमांची आखणी केली जात असल्याचे यावेळी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता आणि ‘नशामुक्त नवी मुंबई’ या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, संजय येनपुरे महाविद्यालयीन विद्यार्थी, नशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईत अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीचे जाळे मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात मोठया प्रमाणावर वास्तव्य करणाऱ्या आफ्रिकन देशातील नागरिकांकडून अमली पदार्थाचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी यासंबंधी मोठ्या प्रमाणावर मोहीमा हाती घेऊन ही साखळी मोडून काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे, असे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी स्पष्ट केले.‘नशा मुक्त नवी मुंबई’ अभियानात पुढील काही दिवस शाळा, महाविद्यालय विद्यार्थी तसेच नागरिकांना सजग करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातील.नवी मुंबई शहर पूर्णपणे अमली पदार्थ मुक्त व्हावे यासाठी पोलीस विभाग मनापासून काम करत आहे, नागरिकांनी याकामी सहकार्य करावे. आपल्याला कोणतीही माहिती असेल तर तातडीने आम्हाला ८८२८११२११२ हेल्पलाईनवर कळवा. आम्ही कारवाई करु, असे आवाहनही भारंबे यांनी केले.