मुंबई : गोवंडीमध्ये ‘ऑनर किलिंग’चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी आधी मुलीची हत्या केली आणि नंतर जावयाचा खून घडवून आणला. करण रमेश चंद्र आणि गुलनाज अशी मृत पती-पत्नीचे नाव असून, गोवंडी पोलिसांनी या दुहेरी हत्याप्रकरणात मुलीचे वडील, भाऊ यांच्यासह सहा जणांची धरपकड केली आहे. यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत. करण आणि गुलनाज यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गोवंडी परिसरात १४ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. काहीतरी संशयास्पद वाटत असल्याने गोवंडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून उपायुक्त हेमराजसिंह राजपूत आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी, ट्रॉम्बे, टिळकनगर, चेंबूर व शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान हा मृतदेह उत्तर प्रदेश येथील रहिवासी करण चंद्र याचा असल्याचे निष्पन्न झाले. करणची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान करण आणि गुलनाज खान या दोघांनी प्रेमविवाह केल्याचे समजले. या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता. संशयावरून पोलिसांनी गुलनाजचे वडील गोरा रईमुद्दीन खान यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान खान यांनी मुलगा सलमान आणि चार जणांच्या मदतीने करणची हत्या केल्याची कबुली दिली.
करणच्या हत्येनंतर गुलनाजचादेखील काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे तिच्या बाबतीतही वडील आणि भावाकडे कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या उलटसुलट प्रश्नांपुढे बापलेकाचे पितळ उघड झाले. गुलनाज हिची हत्या करून तिचा मृतदेह नवी मुंबई येथे फेकल्याची माहिती दोघांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी नवी मुंबईत जाऊन गुलनाजचा मृतदेह ताब्यात घेतला. हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गोरा रईमुद्दीन खान, त्याचा मुलगा सलमान, मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान यांना अटक केली; तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केल्यामुळे त्यांची हत्या केल्याचे बापलेकांनी सांगितले.