नवी मुंबई : परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने केरळमधील २५ बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे ६२ लाख रुपये उकळले. त्यांना नोकरीला न लावता अथवा त्यांचे पैसे परत न करता, त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किशोर चौधरी असे या भामट्याचे नाव असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी किशोर हा रबाळे एमआयडीसीत संगम इलेक्ट्रिक आणि हार्डवेअर स्टोअर्स दुकान चालवत असून त्याने २०२० मध्ये परदेशात नोकरी मिळवून देण्यासंदर्भात फेसबुकवर जाहिरात केली होती. या जाहिरातीला भुलून केरळमधील अनिश कुमार याने किशोर याला संपर्क साधला होता. त्यानंतर तो मित्रासह किशोर याला भेटण्यासाठी रबाळे एमआयडीसीमध्ये आला होता. त्यावेळी किशोरने अझरबाईजान या देशात पेट्रोलियम ड्रिलींग रिंग या कामासाठी ९० पेक्षा जास्त मुले पाहिजे असल्याचे सांगून प्रत्येकाला अडीच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते.
त्यामुळे अनिश कुमार याने मूळ गावातील बेरोजगार तरुणांना याबाबतची माहिती दिल्यानंतर २५ तरुणांनी अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर या सर्व तरुणांनी अनिश कुमार याच्याकडे एकूण ६२ लाख रुपये जमा केले. याबाबतची माहिती अनिश कुमार याने किशोरला दिल्यानंतर त्याने २५ तरुणांना सानपाडा येथे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार जुलै २०२२मध्ये हे २५ तरुण केरळ येथून सानपाडा येथे आल्यानंतर किशोरने त्यांना ऑफर लेटर दिले. तसेच, अनिश कुमार याच्या व्हॉट्सऍपवर २५ जणांचा व्हिसा पाठवून दिला. त्यामुळे किशोरवर विश्वास बसल्यानंतर अनिश कुमार याने ऑगस्ट २०२२मध्ये त्याला ६२ लाख १० हजारांची रक्कम पाठवून दिली. मात्र त्यानंतर किशोरने या तरुणांना अझरबाईजान या देशात नोकरीला पाठविण्यासाठी तसेच, पैसे परत करण्यास नकार दिला.