वसई : वसई विरार शहरात सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे घातले जात असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्यास महापालिकेकडून करण्यात आली आहे. तसे सूचना फलक पालिकेकडून लावण्यात आले आहेत.
दादरमधील कबूतरखाना परिसरात कबुतरांना उघड्यावर दाणे टाकण्यावरून तीव्र वाद निर्माण झाला होता. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागातही या वादाचे पडसाद उमटले होते. तसेच, या वादाला पूर्णविराम देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कबुतरांची पिसे, विष्ठा आदींचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. वसई विरार शहरातही रेल्वे स्थानक, बसथांबे, मंदिरे, खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकाने, तसेच तलावंशेजारील मोकळ्या जागेत पक्ष्यांना दाणे टाकले जात होते. तर यामुळे सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांची पिसे आणि विष्ठा पडून दुर्गंधी पसरू लागली होती. तसेच या ठिकाणांची नीट साफसफाई होत नसल्याने अस्वच्छताही निर्माण झाली होती. तर यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून वसई विरार शहरातही सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांची दाणे टाकण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.







