पुणे : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील गरवारे रोड येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या आंदोलनापूर्वी सरकारने विद्यार्थ्यांच्या १५ सदस्यांच्या शिष्टमंडळाशी तातडीने चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. पुणे पोलिसांकडून अद्याप आंदोलनासाठी परवानगी मिळालेली नसली तरी आंदोलन निश्चित होणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी २६ सप्टेंबर रोजी आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी आंदोलनास परवानगी देता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यामुळे आंदोलनाची तारीख बदलून २७ सप्टेंबर करण्यात आली. हे आंदोलन किती दिवस चालेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी विद्यार्थी ठिय्या आंदोलन करणार असून काही विद्यार्थी उपोषणालाही बसण्याच्या तयारीत असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा, आयोगाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा सुनील गेडाम यांची नियुक्ती, परीक्षा पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने घेणे तसेच ७० हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करणे या मागण्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. आयोगाच्या अध्यक्षांविरोधातील काही पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यास सरकारचा जाहीर सत्कार करू, असेही त्यांनी नमूद केले.
रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही फूट नसल्याचा दावा करत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेसाठी गेलेल्या काही व्यक्ती या प्रत्यक्षात क्लासचालक असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांना दिशाभूल करून चर्चेला नेण्यात आल्याचे ते म्हणाले. आंदोलनाशी संबंधित सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी बुधवारी दिल्लीला जाणार असून राहुल गांधी यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. राहुल गांधी आंदोलनस्थळी येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस प्रशासनालाही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पेपरफुटीच्या घटनांपूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या व्ही. राधा समितीकडून टप्प्याटप्प्याने ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत भूमिका मांडली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन भरती प्रक्रिया वेगाने राबवावी आणि परीक्षांबाबत पारदर्शक धोरण जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.






