मुंबई : वेळेआधीच हजर झालेला मान्सूनने आता दडी मारली आहे. राज्यात आता मान्सून थेट १३ जून रोजी सक्रीय होणार आहे. मे महिन्यातच दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवातीच्या काही दिवसांतच नागरिकांची दाणादाण उडवली होती. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र त्यानंतर आठवडा उलटूनही हवा तसा पाऊस बरसला नाही. पाऊस रेंगाळला असल्याने आता मुसळधार पावसासाठी आणखी चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी, असा सल्ला कृषीविभागाने दिला आहे. १३ जूनपासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे. सध्या निम्मा महाराष्ट्राच मान्सूनने व्यापला असून खान्देशसह विदर्भातच मान्सून रेंगाळला आहे. तसंच, पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पुढीच चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मृग नक्षत्रात पावसाची शक्यता अधिक आहे, असं हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
९ जून म्हणजेच आज मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. नंतर १० ते १२ जूनदरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. तसंच, १२ जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. दरम्यान पावसाने ब्रेक घेतल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे.







