मुंबई : महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुंबई उपनगरातील विविध शाळा महाविद्यालय आणि शासकीय वसतिगृह येथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संस्थानी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मुंबई उपनगरमधील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सप्टेंबर पासून स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र ‘राज्यगीत’ कोनशीले अनावरण मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, जिल्हा नियोजन अधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ त्याचप्रमाणे शासकीय व खासगी आस्थापना यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात. शाळा व महाविद्यालयाने आणि विविध संस्थांनी आपल्याकडे नियुक्त केलेल्या कर्मचारी वर्गाची देखील खात्रीपूर्वक तपासणी करावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच शाळा व महाविद्यालयामधील शौचालयांच्या ठिकाणी जिथे महिला शौचालय आहेत तिथे महिलाच कर्मचारी नियुक्त करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.