मुंबई : गोरेगाव, पहाडी येथे २,५०० हून अधिक घरांची निर्मिती केल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर २,५०० घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरे असणार आहेत. या घरांची निर्मिती दोन टप्प्यांत करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील १,५०० घरांच्या कामासाठी निविदा काढण्याची तयारी मुंबई मंडळाने सुरू केली आहे. पत्राचाळ म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला आपल्या हिश्श्यातील २,७०० घरे सोडतीसाठी विकासकाकडून उपलब्ध होणार होती. मात्र विकासकाने पुनर्विकास अर्धवट सोडल्याने प्रकल्प रखडला. तर दुसरीकडे प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केला. प्रकल्प वादात अडकला आणि शेवटी राज्य सरकारने विकासकाकडून प्रकल्प काढून घेत व म्हाडाकडे सोपवला.
दरम्यान, विकासकाने म्हाडाच्या हिश्श्यातील ३०६ घरांचे काम सुरू केले, मात्र ते अर्धवट सोडले. या अर्धवट घरांसाठीच मंडळाने २०१६ मध्ये सोडत काढली होती. एकूणच प्रकल्प ताब्यात आल्यानंतर मुंबई मंडळाने मूळ रहिवाशांच्या ६७२ घरांसह सोडतीतील घरे पूर्ण करण्याचे काम २०२२ मध्ये हाती घेतले. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना आता मंडळाने आपल्या हिश्श्यातील २,५०० घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. पहिल्या टप्प्यातील एक हजार ५०० घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांतच निविदा प्रसिद्ध केली जाईल, असेही जयस्वाल यांनी सांगितले.