विरार : पावसाळ्याच्या आगमनानंतर वसई-विरार परिसरातील बाजारपेठा आणि आठवडे बाजारांमध्ये विविध प्रकारच्या पारंपरिक रानभाज्यांची विक्री सुरू झाली असून खरेदीदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वर्षभर या हंगामी भाज्यांची वाट पाहणारे ग्राहक आता मोठ्या प्रमाणावर बाजारात गर्दी करत आहेत. उन्हाळ्यातील फळांप्रमाणेच पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांनाही विशेष मागणी असते. वसई-विरार परिसरातील डोंगराळ आणि जंगल भागात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या भाज्या स्थानिक आदिवासी महिला जंगलातून गोळा करून त्यांचे छोटे-छोटे वाटे तयार करतात आणि बाजारात विक्रीसाठी आणतात. पापडी, अंबाडी, पारनाका, सातिवली, अर्नाळा, नालासोपारा रेल्वे स्थानक परिसर तसेच नालासोपारा पूर्व व पश्चिम उड्डाणपुलाजवळील बाजारांमध्ये या रानभाज्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारांमध्ये आदिवासी महिला छोट्या स्टॉलद्वारे या भाज्यांची विक्री करत असून ग्राहकही ताज्या आणि नैसर्गिक भाज्यांना पसंती देताना दिसत आहेत.
सध्या बाजारात शेवळी, सुरणाची फुले, करटोली, कुर्डू, फोडशी, टाकळा, अळू (तेरी), नाली, अळंबी आणि बांबूचे कोंब अशा विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध झाल्या आहेत. या भाज्यांमध्ये नैसर्गिकरीत्या वाढ झाल्यामुळे तसेच त्यांना औषधी गुणधर्म असल्याची धारणा असल्याने अनेक ग्राहक आवर्जून त्यांची खरेदी करत असल्याचे विक्रेत्या महिलांनी सांगितले. पावसाळ्यात या रानभाज्यांच्या विक्रीमुळे आदिवासी महिलांना हंगामी रोजगार उपलब्ध होत असून त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नातही भर पडत आहे. उन्हाळ्यात रानमेवा आणि हस्तनिर्मित वस्तूंच्या विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक महिला पावसाळ्यात रानभाज्यांच्या विक्रीवर अवलंबून असतात. त्यामुळे या पारंपरिक रानभाज्या केवळ खाद्यसंस्कृतीचा भाग नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि आदिवासी महिलांच्या स्वावलंबनालाही बळ देणारे महत्त्वाचे माध्यम ठरत आहेत.
भाज्यांच्या किंमती:
करटोली : १०० रुपये/ प्रति वाटा
कुर्डू : २० ते ३० रुपये/ प्रति जुडी
फोडशी : ३० ते ४० रुपये/ प्रति जुडी
टाकळा : २० ते ३० रुपये/ प्रति जुडी
अळू : १० ते २० रुपये / प्रति जुडी
नाली : ३० ते ४० रुपये/ प्रति जुडी
अळंबी : २०० ते ३००/ प्रति वाटा
बांबूचे कोंब : ५० ते ६०/ प्रति वाटा





