मुंबई : मुंबई, तसेच उपनगरांत गुरुवारी पहाटेपासून पावसाचे धारानृत्य सुरू असून मुंबईतील ठिकठिकाणचे सखल भाग जलमय झाले आहेत. त्याचबरोबर रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई शहर आणि उपनगराला गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून काही ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. यामुळे सकाळपासून वाहतूक सेवा कोलमडली आहे. शहरातील कुलाबा, वरळी, दादर,परळ, तसेच उपनगरांतील वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी गोरेगाव परिसरात पहाटे ४ वाजल्यापासून संततधार पाऊस कोसळत आहे. तसेच लोकल विलंबाने धावत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. सध्या पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत आहेत. हे वारे ६० – ७० ताशी वेगाने वाहाणार असून बाष्प देखील असणार आहे. किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि पूर्व पश्चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र यामुळे मुंबईत आणि काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यात झालेला पाऊस
पनवेल – ९९.६ मिमी
उरण – १२८ मिमी
कर्जत – २३१.२ मिमी
खालापूर – १४३ मिमी
उल्हासनगर – १३६ मिमी
शहापूर – ८० मिमी
ठाणे – १६३ मिमी
मुरबाड – २२८ मिमी
भिवंडी – ११० मिमी
अंबरनाथ – ७० मिमी
कल्याण – ११४ मिमी