नागपूर : ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात प्रचंड गैरव्यवहार सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. अनेक केंद्र बंद अवस्थेत आढळले. मंजुरी एका ठिकाणी असतांना केंद्र दुसऱ्याच ठिकाणी चालवले जाते. याच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाद्वारे राबविण्यात आलेल्या व्यापक पडताळणीत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी १०८ केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांच्या १९ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार या केंद्रांचे विस्तृत जाळे राज्यभर कार्यरत आहे. मात्र, त्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम केंद्र संचालकांकडून केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मीना यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ व ‘आधार सेवा केंद्रां’ची सखोल पडताळणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान एकूण १०८ केंद्रांचा पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये अनेक केंद्र त्यांच्या नियोजित ठिकाणी कार्यरत नसणे, सेवा गुणवत्तेमध्ये त्रुटी, तसेच नागरिकांना वेळेत सेवा न मिळणे अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या अनियमिततेची गंभीर दखल घेत पुढील महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविल्या आहेत. प्रत्येक ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर क्यूआर कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे. नागरिकांना थेट तक्रार व अभिप्राय नोंदविण्यासाठी विशेष डिजिटल यंत्रणा सुरू केली. हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला. सेवा केंद्रांवर सतत देखरेख व मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली. कोणत्याही सेवा केंद्रात अडचणी, गैरसोय किंवा अपूर्ण सेवा आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. प्रत्येक नागरिकाला शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळाली पाहिजे. या मोहिमेमुळे सेवा केंद्रांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून, डिजिटल प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने अकोला जिल्हा एक ठोस पाऊल टाकत आहे, असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले.







