जालना : मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता मराठा विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांप्रमाणे विविध शैक्षणिक सवलती आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आठ महत्त्वाच्या शैक्षणिक योजनांचा विस्तार मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. इयत्ता दहावीनंतरच्या शिक्षणासाठी दिली जाणारी उत्तर-माध्यमिक शिष्यवृत्ती, नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सवलतींचा लाभ आता मराठा विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या योजनांचा फायदा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या निर्णयाचे स्वागत करत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. मराठा समाजाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे सांगत त्यांनी या योजना भविष्यातही सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी मराठा युवकांसाठी मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तसेच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर संस्थास्तरावरील रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती लागू राहतील. विशेष म्हणजे, भविष्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जाहीर होणाऱ्या नवीन शिष्यवृत्ती, शैक्षणिक सवलती किंवा कल्याणकारी योजना स्वतंत्र शासन निर्णयाशिवाय मराठा विद्यार्थ्यांनाही लागू होतील. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होऊन त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.







