मुंबई : लंडनमध्ये राहणाऱ्या महिलेबरोबर मैत्री करणे ८३ वर्षीय व्यक्तीला भलतेच महागात पडले आहे. महिलेने परदेशी चलनासह आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडल्याची बतावणी करून तक्रारदाराला विविध खात्यात रक्कम जमा करण्यास भाग पाडले. याप्रकरणी दोन अज्ञात महिलांविरोधात गोवंडी पोलिसांनी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या प्रकरणामागे सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. ८३ वर्षांचे तक्रारदार गोवंडीतील देवनार परिसरात राहत असून ते व्यवसायाने वकील आहेत. त्यांचा एक मुलगा आणि मुलगी परदेशात वास्तव्यास आहे, तर दुसरा मुलगा त्याच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव येथे राहतो. ८ ऑक्टोबरला ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांना अमेलिया फ्लोरिडा नावाच्या एका अज्ञात महिलेचा संदेश आला होता. तिने त्यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी तिला होकार दर्शविला होता. चर्चेदरम्यान तिने त्यांना ती लंडन येथे राहत असून तिचा बांधकामाशी संबंधित व्यवसाय असल्याचे सांगितले. तिचा आई-वडिलांचा हा व्यवसाय असून सध्या ती त्यांचा व्यवसाय सांभाळते असे सांगितले होते. तिच्या एका नातेवाईकाचा स्वीडन येथे सोन्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी तिला एका नामांकित कंपनीचे सराफ हवे आहेत, ती लवकरच भारतात येणार असल्याचे सांगून याकामी त्यांनी तिला मदत करण्याची विनंती केली होती.
२४ ऑक्टोबरला ती लंडनहून दिल्ली आणि दिल्लीतून रेल्वेने मुंबईत येणार होती. तिच्या प्रवासाचे तिकिट तिने त्यांना व्हॉटसअपवर पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. २४ ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता तिने त्यांना दूरध्वनी करून तिला दिल्ली विमानतळावर पकडले असल्याचे सांगितले. तिच्याकडे एक लाख युके पाऊंड सापडले आहेत, त्यामुळे तिला काही रक्कम कर म्हणून भरावे लागणार आहेत असे तिने सांगितल्यावर त्यांनी तिला ९६ हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर तिने आर्थिक गैरव्यवहार विरोधी कायद्या अंतर्गत आणखी काही पैसे भरावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपये एका बँक खात्यात हस्तांतरित करण्यास सांगतले होते. यावेळी तिने दिल्ली आयुक्त कार्यालयातील एका महिलेशी त्यांचे संभाषण करून दिले होते. अशा प्रकारे तिने विविध कारण सांगून त्यांना सहा लाख एकतीस हजार रुपये हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले. ही रक्कम तिने त्यांना परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ती रक्कम हस्तांतरित केली. ही रक्कम पाठवल्यावरही तिने रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडमध्ये पाऊंड रक्कम भारतीय चलनात रुपांतरित करण्यासाठी आणखी ६ लाख ६५ हजाराची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ती रक्कम देण्यास नकार दिला. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी संबंधित बँकेची चौकशी केली होती. यावेळी गुडगाव येथे अशी कोणतीही बँक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दोन्ही महिलांनी फसवणुकीच्या उद्देशाने मैत्री करून त्यांना विविध कारणांसाठी पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले आणि त्यांची सहा लाख एकतीस हजाराची फसवणूक केली. त्यामुळे त्यांनी सायबर हेल्पलाईनसह गोवंडी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी बँक खात्यांच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत.