उल्हासनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त वाढलेली असताना उल्हासनगरच्या गुन्हा शाखेने एका सराईत गुन्हेराला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून एक देशी पिस्तुलसह दोन जिवंत राउंड तसेच ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी भगवती सबाजीत यादव हा जेवणासाठी नेवाळी नाका परिसरातील हॉटेल साई पॅलेस येथे आला होता. त्याच्याजवळ पिस्तुल असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी जात त्याची झाडाझडती घेतली असताना आरोपीकडे एक देशी पिस्तुलसह दोन जिवंत राउंड त्याचबरोबर सुमारे ३१ हजारांची रोकड आढळून आली.
दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित भगवती यादव याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला असून त्याला अटक केली आहे. या आरोपीविरोधात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात यापूर्वी ही गुन्हा दाखल आहे. भगवती यादव हा चोवीस वर्षाचा असून तो बदलापूर पूर्व कात्रप परिसरात राहणारा आहे. यासंदर्भात हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांचा तपास सुरू आहे.