बर्लिन : जर्मनीची राजधानी बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत साताऱ्याच्या अदिती स्वामीने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. १७ वर्षीय अदितीने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. महिलांच्या वरिष्ठ गटातील कंपाउंड कॅटेगरीत अदितीने दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या मॅस्किकोच्या एड्रिया बकेराचा १४९-१४७ असा पराभव केला. अदितीने जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये देशाला पहिले वैयक्तीक पदक जिंकून दिले आहे. अंतिम फेरीत एड्रियाला क्रमवारीत सहाव्या स्थानकावर असलेल्या अदितीने कठोर असे आव्हान दिले. अदितीने पहिल्या ३ प्रयत्नात तीर अजून ठिकाणी मारला ज्यामुळे तिने ३०-२९ अशी आघाडी घेतली. पुढील ३ फेरीत अदितीने अशीच कामगिरी कायम ठेवल्याने तिला ३ अंकांची आघाडी मिळाली. अखेरच्या फेरीत अदितीने दोन वेळा १० तर एकदा ९ गुण मिळवले, ज्यामुळे तिचे एकूण गुण १४९ झाले तर एड्रियाला १४७ गुण करता आले.
अदितीचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे. कालच शुक्रवारी महिलांच्या सांघिक कम्पाऊंड प्रकारात अदिती, सुरेखा वेन्नम आणि परनीत कौर यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. भारताच्या तिघींनी मॅक्सिकोवर २३५ विरुद्ध २२९ असा विजय मिळवला होता. जागतिक चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी अदिती ही भारताची पहिली वैयक्तीक खेळाडू आहे. कम्पाऊंडमध्ये सुवर्ण जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. या विजेतेपदानंतर अदिती भारावून गेली होती. आज माझ्या प्रयत्यांना फळ मिळाले आहे. व्यासपीठावर मी राष्ट्रगीत वाजवण्याची वाट पाहत होते, असे अदितीने या कामगिरीनंतर म्हटले.