नव्वी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी देशभरातील एकूण १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांना मान्यता देण्यात आली आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाहीये. प्रतिवर्षी देशाच्या राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलनाचे आयोजन करण्यात येते. या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचा समावेश असतो. दरवर्षी कर्तव्य पथावर २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो. पथसंचलनात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. मात्र, यंदाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाहीये. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रत्येक राज्यांच्या चित्ररथाला परवानगी देणे शक्य नसते. यामुळेच प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा चित्ररथ सादर करण्याची संधी देण्यात येते. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात येत असते. तसेच संचलनानंतर निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येते.
यंदाच्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये पंजाबचा चित्ररथ पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबसह १५ राज्यांच्या चित्ररथाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये पंजाबच्या संस्कृतीचे रंग पाहायला मिळतील, संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार, गोवा, झारखंड, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरासह १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांचे सादरीकरण केले जाईल. केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीचा चित्ररथ समाविष्ट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तज्ञांच्या समितीने प्रजासत्ताक दिन परेड २०२५ साठी दिल्लीच्या चित्ररथाची थीम नाकारली आहे. दिल्लीने प्रस्तावित केलेली चित्ररथाची थीम सलग दुसऱ्या वर्षी फेटाळण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की दिल्लीचा चित्ररथ नाकारण्यात आली कारण ती निर्धारित निकर्षांची पूर्तता करत नाही.