मुंबई : मुंबईतील प्रवाशांचा विचार करुन मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गापासून लांब पल्ल्याच्या गाड्या स्वतंत्र चालविण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यात नवीन मार्गिका उभारण्याचा आराखडा असून, ‘एमयूटीपी-३ ब’ अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी मागविण्यात आला आहे. राज्य सरकार या प्रकल्पांवर लक्ष ठेवून असून, काही महिन्यांत याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन प्रकल्पांमुळे पनवेल, नवी मुंबई, वसई विरार, कल्याणकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. मुंबईतील मुख्य व उपनगरीय मार्ग पूर्णपणे स्वतंत्र करण्याचा मुख्य उद्देश आहे. यामुळे उपनगरीय लोकल सेवा अधिक सुरळीत व नियमित चालवता येतील. सध्या पनवेल-वसई मार्ग लांब पल्ल्याच्या गाड्यांसोबतच मेमू सेवांसाठी वापरला जातो. प्रस्तावित नवीन मार्ग मात्र केवळ उपनगरीय गाड्यांसाठी असणार आहे. याशिवाय वसई-विरार व वसई-बोरिवली दिशांना प्रत्येकी एक असे उन्नत उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे भविष्यात पनवेलवरून ठाणे-दिवामार्गे विरार-अंधेरीपर्यंत लोकल गाड्या धावणे शक्य होईल. प्रस्तावित मार्गिका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व पनवेल रेल्वे टर्मिनसशीही जोडल्या जाण्याची शक्यता आहे.
- असे असणार नवीन मार्ग –
कल्याण-कसारा व कल्याण-कर्जतदरम्यान नवीन कॉरिडॉर, विद्यमान मार्गाचे चौपदरीकरण
आसनगाव-कसारा आणि बदलापूर-कर्जत मार्गावर स्वतंत्र दुहेरी मार्गिका
पनवेल आणि वसईदरम्यान ६० कि.मी. लांबीची नवीन उपनगरीय मार्गिका







