वसई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधील गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता कंबर कसली आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या प्रवाशांच्या अलोट गर्दीला शिस्त लावण्यासाठी ‘गर्दी व्यवस्थापन अभियान’ हाती घेण्यात आले आहे. हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
विरारच्या सहाय्यक सुरक्षा आयुक्तांच्या थेट देखरेखीखाली या नवीन नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. आता प्लॅटफॉर्मवर केवळ गर्दी करून उभे राहता येणार नाही, तर प्रवाशांना शिस्तबद्ध रांगेत उभे राहावे लागणार आहे. लोकल प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच सतत अनाउन्समेंट केली जात आहे की, “आधी उतरणाऱ्या प्रवाशांना वाट द्या आणि त्यानंतरच रांगेत चढून सहकार्य करा.” आरपीएफ (RPF) आणि एमएसएफ (MSF) जवानांची एक संयुक्त टीम प्लॅटफॉर्मवर तैनात करण्यात आली आहे. हे जवान केवळ लक्ष ठेवून नसून, प्रवाशांशी संवाद साधून त्यांना नियमांचे महत्त्व पटवून देत आहेत. सध्या हा प्रयोग केवळ नालासोपारा स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे. इथला प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेच्या इतर गर्दीच्या स्थानकांवरही ही शिस्त लागू केली जाणार आहे. नालासोपाऱ्याहून कामासाठी विरार किंवा चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अनेकदा घाईघाईत ट्रेनमध्ये चढताना धक्का-बुक्की होऊन अपघात घडतात. या नवीन व्यवस्थेमुळे प्लॅटफॉर्मवरील गोंधळ कमी होईल आणि प्रवाशांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास नालासोपारा पोस्टच्या सुरक्षा टीमने व्यक्त केला आहे. आता नालासोपारा स्थानकावर लोकल पकडताना प्रवाशांना या ‘क्यु सिस्टीम’चा भाग व्हावे लागेल, जेणेकरून प्रत्येकाचा प्रवास सुसह्य आणि सुरक्षित होईल.







