मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात ‘जोडे मारो आंदोलना’ची हाक दिली आहे. एक सप्टेंबरला गेटवे ऑफ इंडियाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन केले जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीला उद्धव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते. विधानसभेच्या २८८ जागांपैकी अनेक जागांवरून तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. शिवाय छोट्या घटक पक्षांनाही सामावून घ्यायचे आहे. यासंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक सप्टेंबरच्या आंदोलनाची घोषणा केली. यावेळी जागावाटपावर भाष्य करणे त्यांनी टाळले. राजकोट किल्ल्यावर घडलेला प्रसंग दुर्दैवी असून, यामागे भाजपचे गलिच्छ राजकारण असल्याचा आरोप या नेत्यांनी केला. एक सप्टेंबरला दुपारी एक वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेटवे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारच्या प्रतिमेला ‘जोडे मारो आंदोलन’ केले जाणार आहे.
‘राज्यातील सरकार हे महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही आहे. यांच्या नसानसांत शिवद्रोह ठासून भरला असून, महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा दाखला देऊन ताशी ४५ किमी वेगाच्या वाऱ्यांमुळे पुतळ्याचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. या विधानाचा ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘मुख्यमंत्र्यांनी दिलेले कारण निर्लज्जपणाचे आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे समुद्रकिनारी राजभवनावर राहत होते. त्यांनीही महाराजांचा अपमान केला होता; पण समुद्रावरील जोरदार वाऱ्यांमुळे माजी राज्यपाल कोश्यारी यांची टोपी उडाली, असे माझ्या तरी वाचनात कुठे आले नाही,’ असा टोला ठाकरे यांनी या वेळी लगावला. ‘राज्य सरकारने नौदलावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे; पण आपले नौदल इतके पोकळ नाही. त्यांना समुद्रकिनारी वाहणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज असतो. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, कोकण जिंकायचे या ईर्ष्येने घाईघाईत मालवणला कार्यक्रम घेण्यात आला. नवख्या शिल्पकाराकडून ठरावीक वेळेत पुतळा करून घेण्यासाठी दबाव टाकला गेला. समुद्रकिनारी पुतळा उभारताना कोणती काळजी घ्यावी, याचा अभ्यास केला नाही,’ अशी टीकाही ठाकरे यांनी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची भाजप युतीच्या नेत्यांची हिंमत होते कशी,’ असा सवाल नाना पटोले यांनी केला. ‘भ्रष्टाचाराचा कलंक लागलेल्या एका खासदाराने महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर चढवून महाराजांचा अपमान केला. आता मुख्यमंत्री म्हणतात, यापेक्षा मोठा पुतळा बसवू. या कमिशनखोर सरकारला अक्कल कधी येणार? राज्यात आज महिला, शाळेतील मुलीही सुरक्षित नाहीत. जनतेत सरकारविरोधात आक्रोश आहे. घाबरलेले सरकार जनतेचा उठाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे,’ असे पटोले म्हणाले. ‘पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेला पुतळा कोसळणे दुर्दैवी आहे. ही घटना पाठीशी घालण्यासाठी विविध विधाने केली जात आहेत. त्यावरून भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे, हे दिसते. लोकांमध्ये सरकारविरोधात तीव्र भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करणार आहोत,’ असे शरद पवार यांनी या वेळी सांगितले.