मुंबई : मुंबई शहरातील एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला ऑनलाइन शेअर्समधील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याची ५१ लाख ३६ हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. फसवणुकीप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. ५३ वर्षीय तक्रारदार प्रभादेवी परिसरात राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर एक लिंक दिसली होती. त्यात शेअर बाजारात ऑनलाइन गुंतवणुकीद्वारे लाखो कमावण्याची संधी असल्याचे नमुद करण्यात आले होते. तक्रारदाराने त्या लिंकवर क्लिक केले आणि त्यानंतर त्यांना एमएसएफएल स्टॉक चार्ट ३३ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. जुही वि. पटेल या ग्रुपची ॲडमिन होती. तक्रारदाराने शेअर्समध्ये ऑनलाइन गुंतवणूक करण्याबाबत तिच्याशी संवाद साधला. तेव्हा तिने मारवाडी फायन्साशिअल सर्विसची लिंक पाठवली आणि ऑनलाईन अकाउंट उघडण्यासाठी तपशील भरण्यास सांगितले. तक्रारदाराने या अकाउंटद्वारे १० हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले. एक दिवसानंतर तक्रारदाराच्या ऑनलाईन डीमॅट अकाउंटमध्ये २२ हजार ९१५ रुपये जमा झाले. एका दिवसात नफा पाहून तक्रारदाराने जुही वि. पटेलवर विश्वास वाढला आणि तिने दिलेल्या सल्ल्यावर त्यांनी अधिक पैसे गुंतवले.
तक्रारदाराने पटेलच्या सल्ल्याने ५१ लाख ३६ हजार रुपये किमतीच्या शेअर्सची खरेदी केली. त्यावेळी तक्रारदाराने अकाउंटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पैसे काढता आले नाहीत. जुही वि. पटेलला या बाबत प्रश्न विचारल्यावर ती टाळाटाळ करू लागली. पोलिसांनी सांगितले की, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तक्रारदाराचे पैसे परत करण्यास नकार दिला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे तक्रारादारच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात, पोलिसांनी सायबर ॲक्ट 66 (ड) अंतर्गत, तसेच भादंवि कलम ३४, ४१९, ४२०, ४६५, ४६७, आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. तक्रारदाराने जमा केलेल्या रमकेच्या आधारावर तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.