रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या मुख्य पायरी मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. गडावरील महादरवाजा ते मदार मोर्चा या दरम्यानच्या भागात मोठे दगड आणि मातीचा ढिगारा पायरी मार्गावर आल्याने शिवभक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पायरी मार्गावरून कोणालाही गडावर जाण्याची परवानगी दिली जात नसून पुढील आदेश येईपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यावरील माती सैल झाल्याने ही दरड कोसळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पायरी मार्गावरील दगड, माती आणि राडारोडा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र दरड मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे संपूर्ण मार्ग सुरक्षित करण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गप्रेमी, पर्यटक आणि शिवभक्तांनी सध्या पायरी मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांत तिथीनुसार साजरा होणारा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा लक्षात घेता या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यभरातून हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी रायगडावर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पायरी मार्ग बंद असला तरी रायगडावरील रज्जुमार्ग सेवा नियमितपणे सुरू असून तिच्यावर या घटनेचा कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे वृद्ध, लहान मुले, दिव्यांग व्यक्ती तसेच इतर भाविकांसाठी गडावर पोहोचण्याचा सुरक्षित पर्याय म्हणून रज्जुमार्ग उपलब्ध आहे. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हवामानातील बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गड परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पायरी मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच तो पुन्हा खुला करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी मार्ग सुरळीत करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.







