कोकण : एप्रिल ते ऑक्टोबर हा सात महिन्यांचा काळ सुट्ट्यांचा मानला जातो. उन्हाळी सुट्ट्या आणि त्यानंतर गणपती सुट्टी, दिवाळी सुट्टी, नवरात्र असे महत्त्वाचे सण याच सात महिन्याच्या काळात येतात. त्यामुळे सुट्ट्यादेखील मोठ्या प्रमाणात असतात. या सुट्टीच्या दिवसात अनेक जण कोकणात जाण्याचा मार्ग निवडतात आणि यात सर्वांची पसंती असते ती म्हणजे रेल्वेला. मात्र, यातील काही प्रवासी हे विनातिकीट प्रवास करतात. आता अशा विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यास कोकण रेल्वेनं सुरुवात केली असून, एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल दोन लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. आता मोहिमेचा आणि फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईच्या भूमिकेचा चांगलाच परिणाम दिसून आला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या सात महिन्यांत तब्बल सव्वादोन लाख प्रवासी विनातिकीट किंवा अनियमित तिकिटासह प्रवास करताना आढळले. या प्रवाशांकडून तब्बल १५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. याबाबत कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या सात महिन्यांदरम्यान कोकण रेल्वेने ५ हजार ४९३ विशेष तपासणी मोहिमा राबवल्या. या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत एक लाख ८२ हजार ७८१ प्रवासी नियमांचे पालन न करता विनातिकीट प्रवास करताना आढळले. या सर्व प्रवाशांकडून १२ कोटी ८१ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती सुनील नारकर यांनी दिली आहे.







