मुंबई : कांदिवली येथे व्यावसायिकाचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींनी ६० लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारल्यानंतर व्यावसायिकाची सुटका केली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अपहरण, खंडणीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. तक्रारदार बोरिवली येथील रहिवासी असून त्यांचे अंधेरी येते कार्यालय आहे. बुधवारी ८ मे रोजी ते त्यांच्या मित्रासोबत काम संपवून अंधेरीतील कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मोटरगाडी चालक होता. रात्री नऊ वाजता कांदिवली येथे त्यांचा मित्र मोटरगाडीतून उतरला. त्यानंतर मोटरगाडीचे दरवाजे बंद करण्यापूर्वीच दोन तरुण आले आणि ते दोघेही जबदस्ती मोटरगाडीमध्ये बसले. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना मोटरगाडी दहिसरच्या दिशेने घेऊन जाण्यास सांगितले. तेथे व्यावसायिकाला मारहाण करून पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली. कुटुंबियांनाही ठार मारण्याची धमकी दिली.
अखेर व्यावसायिकाने ६० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर चालकाला बोरीवली येथील घरी पाठवून ६० लाख रुपये आणले. ती रक्कम आरोपींना दिल्यानंतर ते काही अंतरावर मोटरगाडीतून खाली उतरले. चार दिवस व्यावसायिक प्रचंड तणावाखाली होते. अखेर कुटुंबियांसह नातेवाईक आणि मित्रांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी चार दिवसानंतर समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे.