मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्यातील सर्वच शहरांमध्ये प्रवासी वर्दळ वाढली आहे. मुंबई-पुणे दरम्यान प्रवासी संख्येतही मोठी वाढ झाली असून, हा प्रवास वेगवान व्हावा आणि प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने अटल सेतू मार्गे धावणाऱ्या वातानुकूलित शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे अटल सेतूवरून आता शिवनेरीच्या १५ फेऱ्या धावणार आहेत. सर्वप्रथम २० फेब्रुवारी रोजी पुणे-मंत्रालय आणि स्वारगेट-दादर शिवनेरी अटल सेतूवरून धावली होती. पहिल्या फेरीतील शिवनेरीला जवळपास ७० टक्के प्रवासी भारमान लाभले होते. अटल सेतूमार्गे धावणाऱ्या शिवनेरीला वाशीतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाही. यामुळे अटल सेतूमार्गे धावणाऱ्या शिवनेरीच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.
मे महिन्याची सुट्टी आणि मुंबई-पुणे प्रवासासाठी वाढलेली गर्दी लक्षात घेता मुंबई, शिवाजी नगर (पुणे) आणि स्वारगेट विभागाने प्रत्येकी पाच शिवनेरी अटल सूतेमार्गे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अटलसेतूमार्गे धावणाऱ्या शिवनेरीची संख्या दोन वरून १७ वर पोहोचली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास वेळ साडेचार तासांवरून साडेतीन तासांवर येईल, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दादरवरून स्वारगेट साठी (पुणे) पहिली शिवनेरी पहाटे ५ वाजता सुटते. त्याचवेळी स्वारगेट वरून दादरसाठी शिवनेरी रवाना होते. मंत्रालय (दादर)-पुणे रेल्वे स्थानक ही शेवटची शिवनेरी रात्री ११ वाजता रवाना होते. रोज मुंबई-पुणे मार्गावर साधारण अर्ध्या तासाच्या फरकाने शिवनेरीच्या एकूण ४३ फेऱ्या पूर्ण होतात. मुंबईवरून पुणे जाताना शिवडी – अटलसेतू – गव्हाण फाटा – कोन – यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गे प्रवास वेळेत एका तासाची बचत होते, असा अभिप्राय एसटीच्या वाहतूक विभागाचा आहे. एसटीच्या अधिकृत msrtc मोबाईल आरक्षण ॲप आणि www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. अटलसेतू मार्गे धावणाऱ्या शिवनेरीच्या तिकीट दरामध्ये कोणताही बदल केलेला नसून, प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
अटलसेतूमार्गे शिवनेरी
मार्ग – भाडे (रुपयांत)
दादर-शिवाजी नगर – ५३५
स्वारगेट-दादर – ५३५
पुणे-मंत्रालय – ५५५
असा असेल मार्ग
दादर -शिवडी -अटलसेतू –गव्हाणपाडा -पळस्पे फाटा -कोन -यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग – शिवाजी नगर (पुणे)