जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या २९ ऑगस्टपासून होणाऱ्या आंदोलनाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. यापूर्वी त्यांनी हे आंदोलन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच, आंदोलनासाठी ‘गनिमी कावा’ वापरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या वक्तव्यानंतर आंदोलनाच्या स्वरूपाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असतानाच आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे २९ ऑगस्टचे आंदोलन अंतरवाली सराटीत होणार की राज्याची राजधानी मुंबईत धडकणार, याबाबत उत्सुकता वाढली असून राजकीय वर्तुळातही या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात आंदोलनासाठी अधिकृत परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे आंदोलनाची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अंतरवाली सराटीऐवजी मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, अंतरवाली सराटी येथे आंदोलनासाठी अद्याप प्रशासनाकडे कोणताही अधिकृत परवानगी अर्ज सादर करण्यात आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, मुंबईतील आंदोलनासाठी परवानगी मिळवण्याचे प्रयत्न मात्र युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या अर्जामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय सहकारी गंगाधर काळकुटे आणि पांडुरंग तारख यांची नावे असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अॅड. आशिष गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून आंदोलनासाठी आवश्यक परवानगी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी आंदोलनासाठी ‘गनिमी कावा’ वापरणार असल्याचे जाहीर केल्यामुळे या नव्या घडामोडींकडे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष लागले आहे. जर आंदोलनाला मुंबईत परवानगी मिळाली, तर राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि आंदोलक राजधानीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनालाही विशेष तयारी करावी लागू शकते. दुसरीकडे, आंदोलन नेमके कुठे होणार याबाबत मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या संघटनेकडून अंतिम अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे २९ ऑगस्टचे आंदोलन अंतरवाली सराटीत होते की मुंबईच्या आझाद मैदानावर, याबाबतचा निर्णय आणि त्यावर सरकारची भूमिका काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






