मुंबई : कोणत्याही कारणाशिवाय निवडणूक आयोगाने मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या पुरवणी यादीत १२ हजार नावे समाविष्ट केली नाहीत या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल परब यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून परब यांनी दिलेली नावे मतदार यादीत का समाविष्ट झालेली नाहीत याचा शोध सुरू केला आहे. शिवसेनेने काही मतदार केंद्रांबाबत घेतलेल्या आक्षेपानंतर आता मतदान केंद्र बदलण्याच्या हालचालीही आयोगाने सुरू केल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली. पुरवणी मतदार यादीमध्ये शिवसेनेने जी नावे नोंदवली होती त्यातील बरीचशी नावे आलेली नाहीत. या मतदारांचे अर्ज स्वीकारल्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. ज्या वेळेस अर्ज सादर दिला जातो त्या वेळेस तो तपासूनच त्याची पोचपावती दिली जाते. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर पोचपावती येते. पोचपावती दिली जात नाही त्या वेळेस तो अर्ज नाकारला जातो आणि त्याची कारणे दिली जातात. अर्ज नाकारण्याची कारणे समजणे हा अधिकार आहे. यंदा अर्ज स्वीकारूनही नावे आलेली नाहीत आणि त्याची कोणतीही कारणे आम्हाला दिलेली नाहीत. यात खूप मोठी गडबड असल्याचा अनेक गंभीर आरोप परब यांनी केले होते. तसेच मुसळधार पावसात पाणी साचणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्रे उभारली आहेत. गैरसोयीची मतदान केंद्रे बदलून द्यावीत अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.