पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. एकाच टप्प्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे व सभा वाढल्या आहेत. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक ही अनेक पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. बारामतीमध्ये देखील चुरशीची लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाची विधानसभा निवडणूक देखील पवार कुटुंबामध्ये होणार आहे. अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांनी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट अनेक मतदारसंघामध्ये आव्हान देत आहेत. अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. निवडणूक आयोगाकडून अजित पवार यांना घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी हे नाव देण्यात आले असले तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक सूचना अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने दिली आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचे प्रकरण कोर्टामध्ये सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाच्या चिन्ह व नावाबाबत सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने चिन्ह व नाव वापरण्यास परवानगी दिली असली तरी काही सूचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा. सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो वापरु नका, असे निर्देश दिले आहे. विधानसभेत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा म्हणून सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांना सांगितले आहे. निवडणूक आयोगाकडून प्रचारावेळी चुकीचा प्रकार घडू नये म्हणून तपासणी केली जात आहे. यामध्ये राजकीय नेते देखील अपवाद नाहीत.अजित पवार यांची बारामतीमध्ये बॅग तपासणी देखील करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या बॅगांची हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. यावेळी अजित पवारांच्या बॅगेमध्ये चकली, चिवडा असा दिवाळीचा फराळ असल्याचे आढळून आले. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले.