नवी दिल्ली : काँग्रेस खासदाराच्या बाकावर नोटांचे बंडल आढळल्याने राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आहे. हे बंडल गुरुवारी काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या आसनावरून सापडल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी संसदीय कामकाज संपल्यानंतर सभागृहाच्या तपासणीत आसन क्रमांक २२२ वरून एक नोटांचं बंडल सापडलं आहे. याबाबतची माहिती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी स्वत: दिली. आता हे नोटांचं बंडल सभागृहात कुणी आणलं, याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी जिथे हे बंडल सापडले आहेत, ते आसन काँग्रेसचे राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांना अलॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे हे नोटांचं बंडल सिंघवी यांनी सभागृहात आणल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावरून आता राज्यसभेत गदारोळ सुरू झाला असून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजपचे खासदार जेपी नड्डा यांनी देखील विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. ही घटना सामान्य नसून सभागृहाच्या प्रतिष्ठेवरचा हा हल्ला असल्याची टीका नड्डा यांनी केली. तर या घटनेची चौकशी केली जाईल, असे राज्यसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे.
या घटनेबाबत राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले की, राज्यसभेतील सीट क्रमांक २२२ वर नोटांचे बंडल सापडले आहेत, हे सीट काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या नावावर आहे. धनखड यांनी ही माहिती दिल्यानंतर काँग्रेसचे खासदार आणि सभागृहातील पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणाचा कोणत्याही एका पक्षाशी संबंध जोडण्यावरून प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, घटनेची चौकशी झाल्यावर दोषी कोण हे स्पष्ट होईल, मात्र आत्ताच थेट कोणावर आरोप करणं योग्य नाही. यावर धनखड म्हणाले की, त्यांनी फक्त जागा क्रमांकाची माहिती दिली असून, त्याचा संबंध कोणत्याही पक्षाशी जोडलेला नाही. राज्यसभेत नोटांचे बंडल आढळण्यावरून सभागृहात गदारोळ सुरू असताना काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. सदनात सापडलेले पैसे आपले नसून आपण केवळ ५०० रुपयांची नोट घेऊन सभागृहात गेल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली असून गुरुवारचा सगळा घटनाक्रमही त्यांनी ट्वीट करून सांगितला आहे. राज्यसभेत आढळलेल्या नोटांच्या बंडलबाबत सिंघवी म्हणाले की, मी केवळ ५०० रुपयांची नोट घेऊन राज्यसभेत गेलो. मी गुरुवारी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी सभागृहात गेलो. एक वाजता सभागृहातून बाहेर पडलो. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत खासदार अयोध्या रामी रेड्डी यांच्यासमवेत संसदेच्या कँटींनमध्ये बसलो. त्यानंतर मी संसदेतून बाहेर पडलो. मी केवळ तीन मिनिटं सभागृहात उपस्थित होतो, असं स्पष्टीकरण खासदार सिंघवी यांनी दिलं.