मुंबई : रणजी ट्रॉफीचे सामने आज सुरु आहे, यामध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची मैफिल पाहायला मिळत आहे. यामध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाचे अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये सामील झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मापासून ते टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालपर्यत सर्व खेळाडू आज रणजी ट्रॉफीचा सामना खेळत आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होणे बंधनकारक केले होते. बीसीसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि शुभमन गिल या खेळाडूंनी २३ जानेवारीपासून सुरू झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भाग घेतला आहे. मात्र, येथेही वरिष्ठ संघाच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली. रोहित शर्मा २०१५ नंतर प्रथमच रणजी सामना खेळण्यासाठी आला आहे. सध्या मुंबईची जम्मू-काश्मीरशी स्पर्धा सुरू आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा या जोडीने निराशा केली. जैस्वाल ८ चेंडूत ४ धावांवर एलबीडब्ल्यू आऊट झाला, तर रोहित शर्माने १९ चेंडूत ३ धावा केल्या. दुसरीकडे पंजाबची कर्नाटकशी स्पर्धा आहे. या सामन्यात गिल पंजाबचे कर्णधार आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला गिल ८ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ४ धावा करून बाद झाला. आता सर्वांच्या नजरा दिल्लीकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतकडे लागल्या आहेत. सौराष्ट्रविरुद्ध दिल्लीचा सामना सुरूच आहे.
विराट कोहली आणि केएल राहुल सध्या देशांतर्गत सामन्यांपासून दूर आहेत. कोहलीच्या मानेत दुखत आहे आणि राहुलच्या कोपरात काही समस्या आहे, परंतु हे दोन्ही खेळाडू ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. भारताला ६ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे, त्यामुळे ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी सामन्यात खेळण्याची ही शेवटची संधी असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. भारताचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेचा पहिला सामना २२ जानेवारी रोजी झाला यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेचा दुसरा सामना २५ जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध टीम सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. २० फेब्रुवारीपासून भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफी खेळणार आहे.





