पुणे : आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पडला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी मंचावर शरद पवारांच्या उजव्या बाजुला अजित पवार तर डाव्या बाजुला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा दिसून आल्या. शरद पवार आणि अजित पवारांच्या यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले असल्याचं दिसून आलं, त्यानंतर आता अजित पवारांनी या वेगळ्या बसण्यामागचं कारण सांगितलं आहे. या कार्यक्रमानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘असं काहीच नाही बाबासाहेबांना शरद पवार साहेबांसोबत बोलायचं होतं मी केव्हाही बोलू शकतो. म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं, मी तिथं असलो तरी मला बोलता येत होतं. माझा आवाज मोठा आहे. दोन खुर्च्या सोडून तिसऱ्याला देखील ऐकायला जातो. त्यामुळे ही काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये बाबासाहेब पहिल्यांदाच सहकार मंत्री झाले आहेत, त्यांना साहेबांशी चर्चा करायची होती, त्यामुळे ते मध्ये बसले होते, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
साहेबांची आणि तुमची चर्चा काय झाली? या पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, या व्यवसायाच्या करता जे महत्वाचे प्रश्न आहेत. त्याचे स्वतः मी सुतोवाच केले त्याच्याबद्दल आमच्या चर्चा झाली, त्यामध्ये सहकार खातं होतं, एक्साईज खातं होतं, कृषी खातं होतं आणि ऊर्जा खातं होतं या चार विभागाचा संबंध या इंडस्ट्रेशन येतो, या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारचा डिपार्टमेंटचा संबंध येत असे अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्या बैठक व्यवस्थेत अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, त्यांच्या जागी बदल करण्यात आला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्यभागी बसले होते. बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये देखील हे दोन्ही एकत्रित एकाच व्यासपिठावरती आले होते. मात्र, त्यावेळी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांना इग्नोर केल्याचं पाहायला मिळालं होतं. आज देखील या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या बाजुला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा होत्या, त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.





