वृत्तसंस्था : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेकमध्ये भारतीय संघाने आपली दादागिरी दाखवली. या प्रकारात भारताच्या गोल्डन बॉय आणि जगातील अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले तर भारताच्या किशोर कुमारने रौप्यपदक जिंकले. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी २०१८ साली त्याने आशियाई स्पर्धेत नीरजने सुवर्ण जिंकले होते. विशेष म्हणजे काल महिलांच्या भालाफेकमध्ये भारताने सुवर्ण जिंकले होते. आता आता पुरुषांनी सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदके जिंकून दिली. या कामगिरीमुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या ८१वर पोहोचली आहे. भारताची ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १८वर पोहोचली आहे. फायनलमध्ये नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८७ मीटरच्या पुढे भाला फेकला होता. मात्र तांत्रिक कारणामुळे नीरजचा हा प्रयत्न ग्राह्य धरला नाही. त्यानंतर नीरजला पुन्हा संधी देण्यात आली ज्यात त्याने ८२.३८ मीटर इतके अंतर पार केले. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने पहिल्या प्रयत्नाच्या आणखी थोडे पुढे भाला फेकला. यावेळी नीरजने ८४.४९ इतक्या लांब भाला फेकला.
भालाफेकच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज आणि किशोर कुमार यांच्यात सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी चुरस सुरू होती. अन्य एकही भालाफेकपटू नीरज आणि किशोरच्या जवळपास दिसत नव्हते. किशोरने तिसऱ्या प्रयत्नात ८७.७७ मीटर लांब भाला फेकला आणि नीरजला मागे टाकले. त्यानंतर नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर लांब भाला फेकत किशोरला मागे टाकले